गुरुवार, २ मार्च, २०१७

जीमेल वर मिळवा आता ५० एमबी पर्यंत ई-मेल

अनिल भापकर
 औरंगाबाद, दि.02 - जीमेल ही ई-मेल पाठवण्यासाठी गुगलने उपलब्ध केलेली प्रणाली आहे. कुठल्याही गुगल युजर्सला जीमेल फुकट वापरता येते अर्थात त्याचे गुगल अकाउंट असावे लागते . जीमेलचा वापर करणारे युजर्सची संख्या करोडोच्या घरात आहे. आता तर जीमेल डेस्कटॉप  बरोबरच स्मार्टफोन, टॅब मध्ये सुद्धा उपलब्ध आहे. विशेष, म्हणजे जीमेल सगळ्याच प्लॅटफॉर्म वर उपलब्ध आहे, जसे कि विंडोज, अँड्रॉइड, आयफोन आदी. ई-मेल पाठविण्यासाठी अनेक युजर्सची पहिली पसंती ही जीमेलच असते.
जीमेल अटॅचमेन्ट साईज ही सेंड आणि रिसिव्हसाठी २५ एमबी होती . मात्र जेव्हा तुम्हाला एखादा मोठी अटॅचमेन्ट साईज असलेली ई-मेल पाठवायची असेल तेव्हा गुगल ड्राईव्ह वर शेअर करणे हा एक पर्याय होता .मात्र आता गुगलने त्यांच्या जीमेल युजर्सला एक मोठी भेट दिली आहे. त्यांनी ई-मेल अटॅचमेन्ट साईज ही ई-मेल रिसिव्ह साठी आता ५० एमबी केली आहे . म्हणजेच तुम्ही इतर ई-मेल सर्व्हिस प्रोव्हाइडर कडून आता ५० एमबीपर्यंत ई-मेल अटॅचमेन्ट मागवू शकता . मात्र गुगल ने जीमेलची सेंड अटॅचमेन्ट साईज लिमिट ही २५ एमबीच ठेवली आहे. त्यामध्ये गुगल ने कुठलाच बदल केलेला नाही . 
anil.bhapkar@lokmat.com

आता फेसबुक रोखणार आत्महत्या

ऑनलाइन लोकमत/अनिल भापकर
मुंबई, दि. 2 - दिवसेंदिवस सोशल मीडिया साईट्स आपापल्या युजर्संना आकर्षक सेवा देण्यासाठी दिवसरात्र मेहनत करीत आहे. काहीही करुन आपले युजर आपल्याला सोडून दुसऱ्या सोशल नेटवर्कींग साईटकडे आकर्षित होऊ नये, यावर या कंपन्यांचा कटाक्ष असतो. या स्पर्धेत युजर्सला काही तरी नवीन द्यावे यासाठी सर्वच सोशल मीडिया प्रयत्न करत असतो. 
 
जगातील सगळ्यात मोठं सोशल मीडिया नेटवर्क म्हणून ओळखले जाणारे फेसबुक तर आपल्या युजर्संना नवीन काहीतरी देण्यास नेहमीच एक पाऊल पुढेच असतो. यावेळी मात्र फेसबुकने सामाजिक भान ठेवत एका वेगळ्याच गंभीर विषयाला हात घातला आहे. तो विषय म्हणजे आत्महत्या.
 
सध्या जगात प्रत्येक चाळीस सेकंदाला एक आत्महत्येची घटना घडते आणि त्यात 15 ते 29 वर्ष वयोगटातील तरुण वर्गाच्या मृत्यूचे आत्महत्या हे कारण दुस-या क्रमांकावर आहे. एवढा हा प्रकार गंभीर आहे. हल्ली काही तरुण आत्महत्या करतानाचे लाईव्ह व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असल्याच्या घटनाही उघडकीस आल्या आहेत.
 
फेसबुकने आर्टीफेशिअल इंटेलिजन्स या तंत्रज्ञानांचा वापर करून असे लाईव्ह आत्महत्या करणारे व्हिडीओ फेसबुकवर आढळून आल्यास फेसबुक लगेच त्यांच्यापर्यंत पोहोचण्यास त्यांच्या मित्रांना मदत करणार आहे. त्यासाठी फेसबुकने सुसाईड प्रीव्हेन्शन टूल लाँच केले आहे. या टूलच्या मदतीने फेसबुक आत्महत्या रोखण्याचा प्रयत्न करणार आहे. यासाठी फेसबुकने विशेष यंत्रणा कार्यान्वित केली आहे.
 
सुसाईड  प्रीव्हेन्शन टूल कसे काम करते ?
फेसबुक लाईव्ह आणि मेसेंजरमध्ये फेसबुकने सुसाईड प्रीव्हेन्शन टूल समाविष्ट केले आहे. जेव्हा एखादी व्यक्तीचा आत्महत्या करणारा व्हिडीओ किंवा स्वत:ला इजा करून घेणारा व्हिडीओ फेसबुकवर दिसेल तेव्हा सुसाईड प्रीव्हेन्शन टूल आर्टिफिशिअल इंटेलिजन्स या तंत्रज्ञानांचा वापर करून लगेच संबंधित व्हिडीओ हा आत्महत्येचा आहे, असे डिटेक्ट करेल. अशा वेळी आत्महत्या करण्याचा करण्याच्या प्रयत्नात असलेल्या युजर्सपर्यंत पोहोचण्यास फेसबुक मदत करणार आहे. त्यामुळे निश्चितच काही प्रमाणात आत्महत्या रोखण्यास मदत होईल. फेसबुकचा हा प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद आहे.
anil.bhapkar@lokmat.com