रविवार, २३ जुलै, २०१७

वाय -चार्ज : चार्जिंग ची परिभाषा बदलणारे तंत्रज्ञान

  • अनिल भापकर/ऑनलाइन लोकमत
    दिवसेंदिवस मोबाईल टेक्नॉलॉजी ने माणसाचे जीवन व्यापून टाकले आहे.मोबाईल शिवाय माणसाचा दिवस सुरू होत नाही आणि दिवसाचा शेवटही मोबाईल शिवाय होत नाही .त्यामुळे आता मोबाईल वापरताना काही गोष्टी फार महत्वाच्या झाल्या आहेत त्या म्हणजे इंटरनेट चा स्पीड आणि मोबाइल चा बॅटरी बॅकअप. मात्र पूर्वी म्हणजे फार फार ततर दहा-बारा वर्षांपूर्वी मोबाईल म्हणजे फक्त वायरलेस टेलिफोन अर्थात लँडलाईन ला पर्याय असाच होता . फार फार तर कॉल करण्यासोबतच एसएमएस चा वापर मोबाईल मध्ये होऊ लागला होता . त्यामुळे त्यावेळी बॅटरी बॅकअप हा काही महत्वाचा विषय त्यावेळी नव्हता . एकदा मोबाईल चार्ज केला कि दोन दिवस परत मोबाईल चार्ज करायची गरज पडत नसे. 
    मात्र जेव्हा पासून मोबाईल स्मार्टफोन झाला तेव्हा पासून स्मार्टफोन म्हणजे पीसी अर्थात कॉम्पुटर ला पर्याय म्हणून वापरले जाऊ लागला . त्यामुळे इंटरनेट स्पीड आणि बॅटरी बॅकअप या दोन गोष्टीला या स्मार्टफोन च्या जमान्यात फारच महत्व आले. इंटरनेट स्पीड ची समस्या काही प्रमाणात फोरजी च्या जमान्यात बऱ्यापैकी सुधारली आहे मात्र बॅटरी बॅकअप ही समस्या मात्र अजूनही स्मार्टफोन युझर्सला बऱ्यापैकी सतावते आहे. त्यासाठी मग पर्याय म्हणून अनेक कंपन्यांनी आपल्या स्मार्टफोन ची बॅटरी कॅपॅसिटी वाढवायला सुरुवात केली तर काही स्मार्टफोन युझर्स बॅटरी बँक चा पर्याय वापरू लागले . तरी सुद्धा स्मार्टफोन चार्जिंग ही समस्या काही प्रमाणात आहेच . 
    मात्र आता वाय -चार्ज नावाचे असे एक तंत्रज्ञान येऊ घातले आहे ज्यामुळे स्मार्टफोन अर्थात स्मार्टफोन फॅमिली म्हणजेच स्मार्टफोन सह टॅब ,डिजिटल वॉच ,विअरेबल डिव्हाइसेस आदींचाही चार्जिंगची समस्या दूर होणार आहे.
    काय आहे वाय-चार्ज तंत्रज्ञान ?
    वाय -चार्ज तंत्रज्ञान हे दोन भागात विभागले गेले आहे एक म्हणजे ट्रान्समीटर युनिट आणि दुसरे म्हणजे रिसिव्हर युनिट. यामध्ये पॉवर ही इन्फ्रारेड बीम च्या साहाय्याने ट्रान्सफर केली जाते. म्हणजे ट्रान्समीटर युनिट हे आपल्या घरात किंवा ऑफिस मध्ये ए सी किंवा डीसी किंवा यूएसबी पॉवर पॉईंट ला जोडलेले असते . तर दुसरे म्हणजे रिसिव्हर युनिट हे स्मार्टफोन किंवा जे डिव्हाईस चार्ज करायचे आहे त्याच्या चार्जिंग पोर्ट मध्ये लावलेले असते किंवा काही स्मार्टफोनमध्येच हे असते.यामध्ये ट्रान्समीटर युनिट हे फार स्मार्ट असते ते आपल्या परिसरातील स्मार्टफोन किंवा इतर डिव्हाईस आपोआप हुडकून काढून लगेच त्याला चार्जिंग करायला सुरुवात करते. म्हणजे तुम्हाला तुमचा स्मार्टफोन चार्ज करायचा आहे हे लक्षात ठेवायची सुद्धा गरज नाही.
    anil.bhapkar@lokmat.com

 

शनिवार, २४ जून, २०१७

आता लवकरच व्हॉट्सअॅप वर शेअर करा काहीही

अनिल भापकर 
 टेक्नोसॅव्ही जगतात बऱ्याच दिवसांपासून ज्या व्हॉट्सअॅप फिचरची लोक वाट पाहात होते ते फिचर आता लवकरच व्हॉट्सअॅप युझर्सना उपलब्ध होणार आहे. ते बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित फिचर म्हणजे ऑल फाईल शेअर. टेक्नोसॅव्ही जगतात व्हॉट्सअॅप हे फीचर कधी सुरु करतो यावर जगभरातील टेक्नोप्रेमींचे लक्ष लागून राहिले होते. आता मात्र व्हॉट्सअॅप लवकरच हे फीचर टेक्नोप्रेमींसाठी खुले करणार आहे. आता सध्या व्हॉट्सअॅपवर आपण फोटो, व्हिडीओ तसेच डॉक फाईल्स शेअर करू शकतो मात्र लवकरच आणखी इतरही फाईल फॉरमॅट आपण शेअर करू शकू .
 
 
नवीन फिचरमध्ये तुम्ही व्हॉट्सअॅपवर व्हिडीओ शेअर करताना अनेक वेगवेगळ्या फॉरमॅटमध्ये शेअर करू शकता. तसेच एमपीथ्री फॉरमॅटमधील गाणीसुद्धा शेअर करणे या नवीन व्हॉट्सअॅप फिचरमुळे शक्य होणार आहे. त्याचप्रमाणे अजूनही बरेच फाईल फॉरमॅट या फिचरमध्ये शेअर करणे शक्य होणार आहे. 
 
मागील वर्षी व्हॉट्सअॅपने डॉक फाईल शेअर करण्याची सुविधा व्हॉट्सअॅप युझर्स ना दिली होती त्यामुळे बराच फायदा व्हॉट्सअॅप युझर्स ला झाला होता . त्यात आता ह्या नविन फिचर मुळे व्हॉट्सअॅप फाईल शेअरिंगमध्ये एक क्रांतीच होणार आहे.विशेष म्हणजे हे फिचर अँड्रॉइड ,आयओएस आणि विंडोज या सगळ्या व्हॉट्सअॅप प्लॅटफॉर्मसाठी उपलब्ध होणार आहे. 
 
व्हॉट्सअॅप वापरताना काय काळजी घ्यावी ?
 
१.कुठल्याही अनोळखी लिंक ला क्लिक करू नका . 
 
२.अनोळखी मित्राने जर काही व्हिडिओ किंवा लिंक पाठविले असल्यास ओपन करू नका .  अथवा शक्य असल्यास कॉल करून लिंक कसली आहे याविषयी खातरजमा करा.
 
३.तुमच्या कडे जर चुकून काही लिंक आलीच तर तुम्ही ती पुढे फॉरवर्ड करू नका.
 
४.तुमच्या स्मार्टफोन मध्ये एखादा चांगला अँटीव्हायरस असू द्या .
 
५.व्हॉट्सअॅप नेहमी अपडेट करत राहा. 
anil.bhapkar@lokmat.com

 

शुक्रवार, १६ जून, २०१७

आता फेसबुक रोखणार दहशतवाद

अनिल भापकर/ऑनलाइन लोकमत  
मुंबई, दि. 16 - जगातील सगळ्यात मोठं सोशल मीडिया नेटवर्क म्हणून ओळखले जाणारे फेसबुक आपल्या युझर्सला नवीन काहीतरी देण्यास नेहमीच एक पाऊल पुढेच असतो. यावेळी मात्र पुन्हा फेसबुकने सामाजिक भान ठेवत एका वेगळ्याच विषयाला हात घातला आहे. तो विषय म्हणजे दहशतवाद.
कारण सध्या अनेक दहशतवादी संघटना लोकांच्या भावना भडकावण्यासाठी तसेच इतर दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्यासाठी सोशल मीडिया चा वापर करताना दिसत आहे.त्यामुळे अशा समाजकंटकांना आवर घालण्यासाठी फेसबुकने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे ठरविले आहे. फेसबुक वर जर लोकांच्या भावना भडकावण्याऱ्या पोस्ट कोणी अपलोड करण्याचा प्रयत्न केला तर अशा पोस्ट लोकांपर्यंत पोहोचण्याआधीच फेसबुककडून डिलीट केल्या जातील .

हे कसे काम करते ?
भावना भडकाविणारे व्हिडिओ किंवा फोटो किंवा टेक्स्ट फेसबुकवर आढळून आल्यास फेसबुक लगेच आर्टीफेशिअल इंटेलिजन्स या तंत्रज्ञानांचा वापर करून असे व्हिडिओ किंवा फोटो किंवा टेक्स्ट लोकांपर्यंत पोहोचण्याआधीच डिलिट करून टाकेल . यासाठी फेसबुकने विशेष यंत्रणा कार्यान्वित केली आहे.आतापर्यंत जर काही आक्षेपार्ह पोस्ट फेसबुकवर असेल आणि जर लोकांनी रिपोर्ट केले तरच फेसबुक असे आक्षेपार्ह पोस्ट डिलीट करत असे.
आता मात्र फेसबुकने अशी यंत्रणा कार्यान्वित केली आहे की जर कोणी फेसबुक युझर्स ने काही आक्षेपार्ह फोटो किंवा व्हिडीओ अपलोड करण्याचा प्रयत्न केला ज्यामुळे सामाजिक स्वास्थ ढवळून निघेल व काही सामाजिक तणाव निर्माण होईल तर अशा पोस्ट लगेच डिलीट केल्या जातील .आर्टीफेशिअल इंटेलिजन्स या तंत्राचा वापर करून अपलोड होणारा फोटो किंवा व्हिडीओ एखाद्या दहशवादी संघटनेशी संबधीत तर नाही ना हे फेसबुक चेक करेल तसेच इमेज मॅचिंग तंत्राच्या साहाय्याने अपलोड होणारा फोटो काही आक्षेपार्ह तर नाही ना हे ही फेसबुक चेक करेल. लँग्वेज अंडरस्टँडिंग तंत्राचा वापर करून अपलोड होणारा व्हिडिओ हा काही आक्षेपार्ह तर नाही ना हे बघितले जाईल व काही आक्षेपार्ह भाषा आढळून आल्यास व्हिडिओ डिलिट केल्या जाईल .त्यासाठी फेसबुक ने खास यंत्रणा कार्यान्वीत केली आहे. त्यामुळे यापुढे फेसबुक च्या माध्यमातून लोकांच्या भावना भडकाविण्याचे काम करणाऱ्या लोकांना आळा बसेल तसेच ज्या दहशवादी संघटना फेसबुक चा वापर करून इतर दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न करत होत्या त्यालाही निश्चित आळा बसेल, अशी अशा करूया .
anil.bhapkar@lokmat.com

 

ट्विटर आता आणखी नवीन रुपात

अनिल भापकर/ ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 16-  दिवसेंदिवस सोशल मेडिया साईट्स आपापल्या युझर्सला आकर्षक सेवा देण्यासाठी दिवसरात्र मेहनत करीत आहे. काहीही करुन आपला युझर आपल्याला सोडून दुसऱ्या साईटवर शिफ्ट नाही झाला पाहिजे, यावर या कंपन्याचा कटाक्ष असतो. त्यामध्ये फेसबुक,व्हॉट्सअँप ,ट्विटर आदी कंपन्या तर फारच आघाडीवर आहेत.
 
मायक्रो ब्लॉगिंग साईट ट्विटरही यामध्ये मागे राहू इच्छित नाही .नुकतेच ट्विटरने आपल्या लेआऊटमध्ये काही बदल करून आणखी आकर्षक करण्याचा प्रयत्न केला आहे. नवीन लेआऊटमध्ये ट्विटरने साइट आणखी सोपी करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच यापूर्वी ट्विटर युझरचा प्रोफाइल फोटो हा चौकोनात असायचा आता नवीन लेआऊट मध्ये प्रोफाइल फोटो गोलाकारमध्ये आहे. त्याचप्रमाणे हेडलाईन आता पहिल्यापेक्षा अधिक बोल्ड असणार आहे.
तसेच आता रिट्विट करणे ,लाईक करणे अधिक सोपे आणि गतिमान केले आहे.
नविन लेआऊट हे सर्व ठिकाणी दिसणार आहे जसे की ट्विटर डॉट कॉम, अँड्रॉइड अँप, आयओएस अँप आदी सर्व ठिकाणी हा लेआऊट बदल दिसणार आहे.
तुमचे टि्वटर अकाउंट कसे सुरक्षित ठेवाल ?
१. लॉगीन व्हेरीफिकेशस इनबल करा .
२. पासवर्ड शक्यतो जेवढा अवघड ठेवता येईल तेवढे चांगले,तसेच ट्विटर अकाउंटला दिलेला पासवर्ड दुसऱ्या वेबसाईटला वापरू नका.
३. शक्यतो अगोदर दिलेला पासवर्ड पुन्हा रिपिट करू नये.
४. १पासवर्ड आणि लास्टपास यासारखे पासवर्ड मॅनेजर वापरण्याचा सल्लादेखील ट्विटरने आपल्या युझर्सला दिला आहे. ज्यामुळे ट्विटर युझर्सला अवघड आणि युनिक पासवर्ड ठेवण्यास या पासवर्ड मॅनेजर ची मदत होईल .
anil.bhapkar@lokmat.com

 

रविवार, ११ जून, २०१७

आता स्मार्टफोनसाठी गुगलचा रिकॅपचा

अनिल भापकर
गुगलने स्मार्टफोन युझर्सच्या सुरक्षेच्या दृष्टीने अजून एक पाऊल उचलले असून आता गुगल अँड्रॉइड धारकांच्या सुरक्षेसाठी रिकॅपचा चा वापर करणार आहे. ज्यामुळे स्मार्टफोनच्या सुरक्षेमध्ये अजून भर पडणार आहे. म्हणजे आता स्मार्टफोनमध्ये इनव्हिजीबल रिकॅपचा चा वापर करून जो स्मार्टफोन वापरात आहे तो माणूसच आहे कोणी रोबोट किंवा व्हायरस नाही हे ओळखणार आहे. हे ओळखण्यासाठी मशीन लर्निंग आणि ऍडव्हान्स रिस्क ऍनालिसिस तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. म्हणजे तुमच्या स्मार्टफोनच्या छोट्याशा स्क्रीन वर तुम्हाला आता कॅपचाची बारीक अक्षरे वाचावी लागणार नाही . हे काम तुमचा स्मार्टफोन करेल.

कॅपचा म्हणजे नेमकं काय ?
जेव्हा तुम्ही एखादा ई-मेल आयडी तयार करता किंवा एखाद्या वेबसाईटवर साईन अप करता तेव्हा सगळ्यात शेवटी एका बॉक्समध्ये काही वेडीवाकडी इंग्रजी अक्षरे तुम्हाला दाखविली जातात आणि ती ओळखून तुम्हाला दुसऱ्या बॉक्समध्ये लिहायला सांगितले जाते. ही अक्षरे एकमेकात घुसलेली असतात, लवकर ओळखता येत नाही.म्हणजे पी आहे कि क्यू आहे? बी आहे कि  डी आहे? कॅपिटल आहे कि स्मॉल लेटर आहे? हे ओळखताना अगदी नाकीनऊ येते आणि तुम्हाला त्या वेबसाईट वाल्यांचा रागही येतो, की  हे वेबसाईटवाले फुकट साईन अप करायला देतात म्हणजे काय आपली परीक्षा घेणार का ? ही सर्व वेडीवाकडी अक्षरे डोळ्यांच्या डॉक्टरांप्रमाणे ओळखायला का लावतात? यामागे काही उद्देश आहे,की उगीच आपल्याला त्रास देण्यासाठी वेबसाईटवाले असे करतात? असे एक ना अनेक प्रश्न आपल्या मनातं येतात .
ही जी वेडीवाकडी अक्षरे तुम्हाला लिहायला सांगितली जातात, त्याला आयटीवाल्यांच्या भाषेत  कॅपचा असे म्हणतात. कॅपचा म्हणजे ‘कम्प्लिटली आॅटोमेटेड पब्लिक ट्युरिंग टेस्ट टू टेल कॉम्प्युटर्स अँड ह्युमन अपार्ट’चे लघुरूप आहे.
कॅपचा कशासाठी ?
कॅपचा हा एक प्रोग्राम आहे. तो आॅनलाईन टेस्ट घेत असतो. म्हणजे जो यूजर एखाद्या वेबसाईटवर साईन अप किंवा रजिस्ट्रेशन करतो, त्यावेळी हा प्रोग्राम त्याला काही वेडीवाकडी अक्षरे दाखवतो आणि ती अक्षरे दुसऱ्या बॉक्समध्ये ओळखून लिहावे लागतात. कॅपचा ही वेबसाईट सिक्युरिटीसाठी वापरली जाते. ते कसे हे खाली पाहूया.
१. वेबसाईटवर बोगस रजिस्ट्रेशन टाळण्यासाठी-
अनेक वेबसाईटवर मोफत रजिस्ट्रेशन उपलब्ध असते. अशा वेळी बॉटस् या व्हायरसचा वापर करून बोगस रजिस्ट्रेशन अशा वेबसाईट्सवर केल्या जाऊ शकते. तेव्हा हे बोगस रजिस्ट्रेशन टाळण्यासाठी कॅपचाचा वापर केला जातो;कारण अजून तरी कॅपचा वाचता येईल असा प्रोग्राम किंवा व्हायरस बनविण्यात फारसे यश आलेले नाही. त्यामुळे बॉटससारख्या व्हायरसला कॅपचा वाचता येत नसल्यामुळे बोगस रजिस्ट्रेशन बऱ्यापैकी थांबविणे शक्य झाले आहे.
२. डिक्शनरी अ‍ॅटॅक टाळण्यासाठी-
डिक्शनरी अ‍ॅटॅक हा पासवर्ड हॅक करण्याचा एक प्रकार असतो, त्यामुळे जेव्हा तुम्ही एखाद्या वेबसाईटवर रजिस्ट्रेशन करता किंवा पासवर्ड बदलता त्यावेळी कॅपचाचा वापर केला जातो; जेणेकरून तुमचा पासवर्ड सुरक्षित राहतो.
३. आॅनलाईन पोलसाठी-
जेव्हा एखादी आॅनलाईन पोल घेतली जाते, त्यावेळी बोगस वोटिंग टाळण्यासाठी कॅपचाचा वापर केला जातो; जेणेकरून व्हायरसचा वापर करून बोगस वोटिंग केल्या जाऊ नये.
कॅपचाचा इतिहास
ही जी वेडीवाकडी अक्षरे तुम्हाला लिहायला सांगितली जातात, त्याला आयटीवाल्यांच्या भाषेत कॅपचा असे म्हणतात. कॅपचा म्हणजे ‘कम्प्लिटली आॅटोमेटेड पब्लिक ट्युरिंग टेस्ट टू टेल कॉम्प्युटर्स अँड ह्युमन अपार्ट’चे लघुरूप आहे. सगळ्यात पहिल्यांदा कॅपचाचा वापर अल्टाव्हिस्टा या वेबसाईटने १९९७ साली केला.कॅपचाच्या वापरामुळे अल्टाव्हिस्टा वेबसाईटचा स्पॅमचा ९५ टक्के त्रास कमी झाला. २००० साली याहूच्या चाटरूममध्ये चॅटिंग करताना काही बॉटस् (अर्थात व्हायरस) चॅटिंग करणाऱ्याना  डिस्टर्ब करायचे व जाहिराती असलेल्या वेबसाईटकडे  घेऊन जायचे. या समस्येवर उपाय करण्यासाठी याहूने कॅपचाचा वापर सुरू केला.या वेड्यावाकड्या अक्षरांना कॅपचा हे नावसुद्धा २००० साली मिळाले. त्यानंतर मात्र अनेक वेबसाईट, ब्लॉग आदींनी साईन अप करताना कॅपचाचा वापर करायला सुरुवात केलेली आहे. यामध्ये फेसबुक ,गुगल आदीसुद्धा आहेत.
anil.bhapkar@lokmat.com

 

रविवार, ४ जून, २०१७

आता 'फायरबॉल'चा धुमाकूळ

अनिल भापकर
औरंगाबाद, दि. 3 - नुकतेच काही दिवसापूर्वी भारतासहित जवळपास १०० देशात 'वन्नाक्राय ' या 'रॅन्समवेअर' व्हायरस ने अक्षरशः धुमाकूळ घातला होता. शंभराहून अधिक देश या हल्ल्याचे शिकार झाले होते. जगभरात जवळपास पंचाहत्तर हजार संगणकावर हा हल्ला झाला होता. या घटनेतून नेटीझंस सावरते ना सावरते तोच अजून एक दुसरा व्हायरसचा हल्ला झाल्याचे निदर्शनात आले आहे. या व्हायरसचे नाव फायरबॉल असून हा मॅलवेअर आहे. चेकपॉईंट या सिक्युरिटी फर्म ने सांगितले कि फायरबॉल हा चायनीज मॅलवेअर असून त्याने आतापर्यंत जगभरात जवळपास २५० मिलियन कॉम्प्युटर्स ला प्रभावित केले आहे.



फायरबॉल काय करतो ?
फायरबॉल हा मॅलवेअर तुमच्या वेब ब्राऊजर वर हल्ला करतो आणि तुमच्या ब्राऊजरचा ताबाच घेऊन टाकतो . त्यानंतर हा मॅलवेअर तुमच्या कॉम्पुटर वर काही कोड अर्थात छोटा प्रोग्राम इन्स्टॉल करून तुमच्या सर्व ब्राउजिंग वर नजर ठेवतो. तसेच या छोट्या प्रोग्राम च्या मदतीने तुमचा डेटा चोरून आपल्या मालकाकडे अर्थात हॅकर कडे पाठवितो . तसेच तुमचे जे डिफाल्ट सर्च इंजिन आहे त्याजागी फेक सर्च इंजिन कार्यरत करतो त्याचप्रमाणे तुमचे होम पेज च्या जागी फेक होम पेज कार्यरत करतो. या फेक सर्च इंजिन आणि फेक होम पेज च्या माध्यमातून हा तुमच्यावर जाहिरातीचा भडीमार करून आपल्या मालकाला अर्थात हॅकर ला पैसे कमावून देतो. 
 
काय काळजी घ्यावी ?
१. कुठल्याही साईटवरून काही फ्री सॉफ्टवेअर किंवा अन्य काहीही फ्री डाउनलोड करू नका . 
या मोफत मिळणाऱ्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून हा मॅलवेअर तुमच्या कॉम्पुटर मध्ये प्रवेश 
करतो. 
२.इंटरनेट वापरताना नेहमी सुरक्षित वेबसाईटलाच भेट द्या. कुठल्याही मोफत भूलथापाना बळी पडुन चुकीच्या वेबसाईटला किंवा अनोळखी लिंकला क्लिक करू नका . 
३. संगणक किंवा लॅपटॉपची ऑपरेटींग सिस्टमही नेहमी अपडेट असावी कारण अपडेट मध्ये बऱ्याच वेळा काही प्रॉब्लेम्स वर सोलुशन उपलब्ध असते . 
४.तुमच्या संगणक किंवा लॅपटॉप मध्ये चांगला अ‍ॅण्टीव्हायरस असणे तसेच अ‍ॅण्टीव्हायरस नियमित 
अपडेट असणे आवश्यक आहे.
५.तुमचे सर्च इंजिन किंवा होम पेज बदलले असल्यास लगेच विंडोजच्या प्रोग्राम्स अँड फीचर्स 
मध्ये जाऊन ऍडवेअर काढून टाकावे .
anil.bhapkar@lokmat.com

रविवार, २८ मे, २०१७

सावधान : आता 'व्हॉट्सअ‍ॅप'च्या माध्यमातून व्हायरस
  • अनिल भापकर/ऑनलाइन लोकमत
    मुंबई, दि. 17 - वन्नाक्राय या रॅन्समवेअर व्हायरसने अक्षरश: धुमाकूळ घातला असतानाच आता जगभरात 56 कोटी युझर्स वैयक्तिक इमेल आणि पासवर्ड लीक झाल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. म्हणजेच हॅकर आता वेगवेगळ्या माध्यमातून तसेच व्हायरसचे हल्ले करीत आहे.आता तर या हॅकर्स ने व्हॉट्सअ‍ॅप च्या माध्यमातून व्हायरस पसरविण्यास सुरुवात केली आहे. सध्या एक लिंक व्हॉट्सअ‍ॅप च्या माध्यमातून सगळीकडे व्हायरल होत आहे ते म्हणजे या लिंक वर क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅपचा कलर बदलता येतो.

    या संबंधीची अधिक माहिती अशी की मागील काही दिवसांपासून व्हॉट्सअ‍ॅप च्या माध्यमातून एक मेसेज सगळीकडे फिरत आहे तो मेसेज म्हणजे जर तुम्हाला तुमचे व्हॉट्सअ‍ॅप अधिक कलर फुल्ल करायचे असेल अर्थात तुमच्या व्हॉट्सअ‍ॅप अप्लिकेशन चा कलर चेंज करायचा असेल तर खालील लिंक वर क्लिक करा असा मेसेज असतो. जर ह्या लिंक वर क्लिक केले तर तुम्हाला व्हॉट्सअ‍ॅपच्या ऑफिसिअल साईटवर घेऊन जाण्याऐवजी दुसऱ्याच डोमेन वर ही लिंक घेऊन जाते. नंतर तुम्हाला व्हेरिफिकेशन साठी ही लिंक तुमचे व्हॉट्सअ‍ॅप फ्रेंड आणि व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप मध्ये शेअर करण्यास सांगितले जाते.ही फेक व्हॉट्सअ‍ॅप लिंक म्हणजे दुसरे तिसरे काही नसून मॅलवेअर चा प्रकार असून जो तुमचा डेटा चोरण्याचे काम करतो. जेव्हा तुम्ही अशा प्रकारच्या फेक लिंक वर क्लिक करता तेव्हा एक छोटासा प्रोग्राम तुमच्या स्मार्टफोन वर इन्स्टॉल होतो जो डेटा चोरून तो डेटा हॅकर कडे पाठविण्याचे काम करतो त्यालाच मॅलवेअर असे म्हणतात.
    काय काळजी घ्यावी ?
    १. सगळ्यात महतवाचे म्हणजे व्हॉट्सअ‍ॅप कधीच अशा प्रकारचे मेसेज आपल्या युझर्सला पाठवत नाही कारण व्हॉट्सअ‍ॅपचे अपडेट हे गुगल प्ले किंवा अँपल स्टोअर मार्फत मिळतात.
    २. कुठल्याही अनोळखी लिंक ला क्लिक करू नका जे सांगतात कि या मध्ये व्हॉट्सअ‍ॅप अपडेट उपलब्ध आहेत.
    ३. अनोळखी मित्राने जर काही व्हिडिओ किंवा लिंक पाठविले असल्यास ओपन करू नका . अथवा शक्य असल्यास कॉल करून लिंक कसली आहे याविषयी खातरजमा करा.
    ४.तुमच्या कडे जर चुकून अशी लिंक आलीच तर तुम्ही ती पुढे फॉरवर्ड करू नका.
    ५. तुमच्या स्मार्टफोन मध्ये एखादा चांगला अँटीव्हायरस असावा .
    anil.bhapkar@lokmat.com