रविवार, ११ जून, २०१७

आता स्मार्टफोनसाठी गुगलचा रिकॅपचा

अनिल भापकर
गुगलने स्मार्टफोन युझर्सच्या सुरक्षेच्या दृष्टीने अजून एक पाऊल उचलले असून आता गुगल अँड्रॉइड धारकांच्या सुरक्षेसाठी रिकॅपचा चा वापर करणार आहे. ज्यामुळे स्मार्टफोनच्या सुरक्षेमध्ये अजून भर पडणार आहे. म्हणजे आता स्मार्टफोनमध्ये इनव्हिजीबल रिकॅपचा चा वापर करून जो स्मार्टफोन वापरात आहे तो माणूसच आहे कोणी रोबोट किंवा व्हायरस नाही हे ओळखणार आहे. हे ओळखण्यासाठी मशीन लर्निंग आणि ऍडव्हान्स रिस्क ऍनालिसिस तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. म्हणजे तुमच्या स्मार्टफोनच्या छोट्याशा स्क्रीन वर तुम्हाला आता कॅपचाची बारीक अक्षरे वाचावी लागणार नाही . हे काम तुमचा स्मार्टफोन करेल.

कॅपचा म्हणजे नेमकं काय ?
जेव्हा तुम्ही एखादा ई-मेल आयडी तयार करता किंवा एखाद्या वेबसाईटवर साईन अप करता तेव्हा सगळ्यात शेवटी एका बॉक्समध्ये काही वेडीवाकडी इंग्रजी अक्षरे तुम्हाला दाखविली जातात आणि ती ओळखून तुम्हाला दुसऱ्या बॉक्समध्ये लिहायला सांगितले जाते. ही अक्षरे एकमेकात घुसलेली असतात, लवकर ओळखता येत नाही.म्हणजे पी आहे कि क्यू आहे? बी आहे कि  डी आहे? कॅपिटल आहे कि स्मॉल लेटर आहे? हे ओळखताना अगदी नाकीनऊ येते आणि तुम्हाला त्या वेबसाईट वाल्यांचा रागही येतो, की  हे वेबसाईटवाले फुकट साईन अप करायला देतात म्हणजे काय आपली परीक्षा घेणार का ? ही सर्व वेडीवाकडी अक्षरे डोळ्यांच्या डॉक्टरांप्रमाणे ओळखायला का लावतात? यामागे काही उद्देश आहे,की उगीच आपल्याला त्रास देण्यासाठी वेबसाईटवाले असे करतात? असे एक ना अनेक प्रश्न आपल्या मनातं येतात .
ही जी वेडीवाकडी अक्षरे तुम्हाला लिहायला सांगितली जातात, त्याला आयटीवाल्यांच्या भाषेत  कॅपचा असे म्हणतात. कॅपचा म्हणजे ‘कम्प्लिटली आॅटोमेटेड पब्लिक ट्युरिंग टेस्ट टू टेल कॉम्प्युटर्स अँड ह्युमन अपार्ट’चे लघुरूप आहे.
कॅपचा कशासाठी ?
कॅपचा हा एक प्रोग्राम आहे. तो आॅनलाईन टेस्ट घेत असतो. म्हणजे जो यूजर एखाद्या वेबसाईटवर साईन अप किंवा रजिस्ट्रेशन करतो, त्यावेळी हा प्रोग्राम त्याला काही वेडीवाकडी अक्षरे दाखवतो आणि ती अक्षरे दुसऱ्या बॉक्समध्ये ओळखून लिहावे लागतात. कॅपचा ही वेबसाईट सिक्युरिटीसाठी वापरली जाते. ते कसे हे खाली पाहूया.
१. वेबसाईटवर बोगस रजिस्ट्रेशन टाळण्यासाठी-
अनेक वेबसाईटवर मोफत रजिस्ट्रेशन उपलब्ध असते. अशा वेळी बॉटस् या व्हायरसचा वापर करून बोगस रजिस्ट्रेशन अशा वेबसाईट्सवर केल्या जाऊ शकते. तेव्हा हे बोगस रजिस्ट्रेशन टाळण्यासाठी कॅपचाचा वापर केला जातो;कारण अजून तरी कॅपचा वाचता येईल असा प्रोग्राम किंवा व्हायरस बनविण्यात फारसे यश आलेले नाही. त्यामुळे बॉटससारख्या व्हायरसला कॅपचा वाचता येत नसल्यामुळे बोगस रजिस्ट्रेशन बऱ्यापैकी थांबविणे शक्य झाले आहे.
२. डिक्शनरी अ‍ॅटॅक टाळण्यासाठी-
डिक्शनरी अ‍ॅटॅक हा पासवर्ड हॅक करण्याचा एक प्रकार असतो, त्यामुळे जेव्हा तुम्ही एखाद्या वेबसाईटवर रजिस्ट्रेशन करता किंवा पासवर्ड बदलता त्यावेळी कॅपचाचा वापर केला जातो; जेणेकरून तुमचा पासवर्ड सुरक्षित राहतो.
३. आॅनलाईन पोलसाठी-
जेव्हा एखादी आॅनलाईन पोल घेतली जाते, त्यावेळी बोगस वोटिंग टाळण्यासाठी कॅपचाचा वापर केला जातो; जेणेकरून व्हायरसचा वापर करून बोगस वोटिंग केल्या जाऊ नये.
कॅपचाचा इतिहास
ही जी वेडीवाकडी अक्षरे तुम्हाला लिहायला सांगितली जातात, त्याला आयटीवाल्यांच्या भाषेत कॅपचा असे म्हणतात. कॅपचा म्हणजे ‘कम्प्लिटली आॅटोमेटेड पब्लिक ट्युरिंग टेस्ट टू टेल कॉम्प्युटर्स अँड ह्युमन अपार्ट’चे लघुरूप आहे. सगळ्यात पहिल्यांदा कॅपचाचा वापर अल्टाव्हिस्टा या वेबसाईटने १९९७ साली केला.कॅपचाच्या वापरामुळे अल्टाव्हिस्टा वेबसाईटचा स्पॅमचा ९५ टक्के त्रास कमी झाला. २००० साली याहूच्या चाटरूममध्ये चॅटिंग करताना काही बॉटस् (अर्थात व्हायरस) चॅटिंग करणाऱ्याना  डिस्टर्ब करायचे व जाहिराती असलेल्या वेबसाईटकडे  घेऊन जायचे. या समस्येवर उपाय करण्यासाठी याहूने कॅपचाचा वापर सुरू केला.या वेड्यावाकड्या अक्षरांना कॅपचा हे नावसुद्धा २००० साली मिळाले. त्यानंतर मात्र अनेक वेबसाईट, ब्लॉग आदींनी साईन अप करताना कॅपचाचा वापर करायला सुरुवात केलेली आहे. यामध्ये फेसबुक ,गुगल आदीसुद्धा आहेत.
anil.bhapkar@lokmat.com

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा