सोमवार, १२ सप्टेंबर, २०१६

गुगलचे इन ऍप्स सर्च

  • अनिल भापकर
    काही दिवसापूर्वी तुम्ही तुमच्या मित्रासोबत स्मार्टफोन वर चॅट करत असताना त्याने तुम्हाला  शहरात नुकतेच नविन उघडलेल्या रेस्टॉरंट विषयी सांगितले होते. आणि आज तुमचा त्या रेस्टॉरंट मध्ये जेवायला जायचा मुड आहे. मात्र आता तुम्हाला त्या रेस्टॉरंटचे नावच आठवत नाही. तुमचा मित्र फोन उचलत नाही शिवाय जुना चॅट मेसेज असल्यामुळे शोधायला वेळ लागेल अशा वेळी काय कराल ? गुगलने तुमच्या या समस्यांचे निराकरण नुकतेच एक नवीन फिचर लाँच करून केले आहे. त्या फिचर चे नाव आहे इन ऍप्स . याचा वापर करून तुम्ही तुमच्या स्मार्टफोनवर रेस्टॉरंट असा सर्च दिला कि तुमच्या स्मार्टफोन वर ज्या ज्या ठिकाणी रेस्टॉरंट हा शब्द आलेला आहे ते सर्व क्षणात तुमच्या समोर हजर होईल.
    आतापर्यंत गुगल सर्च म्हटले कि वेब सर्च असाच त्याचा अर्थ होत असे . मात्र आता गुगलने नुकतेच एक ऑफलाईन अँड्रॉइड स्मार्टफोन सर्च फिचर लाँच केले आहे. जो तुमचा अँड्रॉइड स्मार्टफोन ऑफलाईन सर्च करेल. याचा वापर  करून तुम्ही तुमच्या अँड्रॉइड स्मार्टफोन वरील कन्टेन्ट शोधू शकता . शिवाय हा सर्च ऑफलाईन असल्यामुळे त्यासाठी इंटरनेट ची सुद्धा गरज नसेल.
    सध्या तरी इन ऍप्स फक्त जीमेल ,स्पोटिफाय ,युट्युब आदींसोबत सर्च करेल मात्र लवकरच एव्हरनोट ,फेसबुक मेसेंजर, ग्लाइड, लिंक्डइन, टू-डू-लिस्ट, आदी ऍप्स साठी लवकरच उपलब्ध करून देण्यात येईल असे गुगलने सांगितले आहे. शिवाय नवीन येणाऱ्या अँड्रॉइड ओएस सोबत होम स्क्रीन वरच इन ऍप्स चा शॉर्टकटही असेल.
    anil.bhapkar@lokmat.com

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा