रविवार, २८ मे, २०१७

 

जगभरात 'रॅन्समवेअर' व्हायरसचा धुमाकूळ

अनिल भापकर/ ऑनलाइन लोकमत
शुक्रवारचा दिवस हा माहिती तंत्रज्ञान क्षेत्रासाठी काळा दिवस ठरला कारण आता पर्यंतचा सर्वात मोठा 'रॅन्समवेअर' व्हायरसचा हल्ला शुक्रवारी झाला. भारतासहित जवळपास १०० देशात 'वन्नाक्राय ' या 'रॅन्समवेअर' व्हायरस ने अक्षरशः धुमाकूळ घातला . सायबर सिक्युरिटी फर्म अव्हास्ट ने सांगितले कि जगभरात जवळपास पंचाहत्तर हजार संगणकावर हा हल्ला झाला. शंभराहून अधिक देश या हल्ल्याचे शिकार झाले . या हल्ल्याचा सर्वात जास्त फटका इंग्लड ला बसला . इंग्लडमधील हॉस्पिटल्स आणि टेलिफोन यंत्रणा यामुळे खिळखिळी झाली . अनेक हॉस्पिटल्स मध्ये तर रुग्णांचे ऑपेरेशन आणि अपाईनमेंट देखील रद्द करावे लागले तर अनेक ठिकाणी रुग्णांचा डेटा नससल्यामुळे डॉक्टरांवर कागद पेन घेऊन रुग्णांचा चार्ट तयार करण्याची वेळ आली.


 


'रॅन्समवेअर' म्हणजे नेमकं काय ?
एखाद्या दिवशी तुम्ही तुमचा संगणक किंवा लॅपटॉप चालू करायला जाता आणि त्यावर एक मेसेज तुम्हाला दिसतो कि तुमचा संगणक किंवा लॅपटॉप आम्ही हॅक केलेले असून तुमचा संपूर्ण डेटा तुम्हाला हवा असल्यास स्क्रिन वर दिसत असलेल्या पेमेंट ऑप्शन ला क्लिक करून अमुक इतकी रक्कम ह्या बँक खात्यात पुढील अमुक इतक्या तासात जर ही रक्कम जमा झाली नाही तर तुमचा सर्व डेटा डिलिट होईल. तुमच्या स्क्रीनवर एका बाजूला तुम्हाला दिलेल्या वेळेचे काउंट डाऊन सुद्धा चालू झालेले असते. अर्थात तुमच्या संगणक किंवा लॅपटॉपचा संपूर्ण ताबा ह्या हॅकर्स ने घेतलेला असतो. ह्या मेसेजच्या पुढे तुमचा संगणक किंवा लॅपटॉप जातच नाही अर्थात तुमची ऑपरेटींग सिस्टम चालूच होत नाही. ह्या प्रकारच्या सायबर गुन्हेगारीला रॅन्समवेअर असे म्हणतात. ह्या मध्ये कुणीतरी सायबर गुन्हेगार अज्ञात ठिकाणाहून तुमचा संगणक किंवा लॅपटॉप हॅक करतो आणी तुम्हाला खंडणीची मागणी करतो. असे प्रकार जगात अनेक ठिकाणी उघडकीस आलेले आहेत .जगाच्या कुठल्या तरी कानाकोपर्‍यात बसून तुमचा डेटा नष्ट करण्याचे उद्योग हे ‘सायबर भामटे’ करायला लागले.
 
काय काळजी घ्यावी ?
१. सगळ्यात आधी तर तुमच्या संगणक किंवा लॅपटॉप मध्ये चांगला अ‍ॅण्टीव्हायरस असणे तसेच
अ‍ॅण्टीव्हायरस नियमित अपडेट असणे आवश्यक आहे.
२.इंटरनेट वापरताना नेहमी सुरक्षित वेबसाईटलाच भेट द्या. कुठल्याही मोफत भूलथापाना बळी पडुन चुकीच्या वेबसाईटला किंवा अनोळखी लिंकला क्लिक करू नका .
३. संगणक किंवा लॅपटॉपची ऑपरेटींग सिस्टमही नेहमी अपडेट असावी कारण अपडेट मध्ये बऱ्याच वेळा काही प्रॉब्लेम्स वर सोलुशन उपलब्ध असते . जसे कि 'रॅन्समवेअर' साठी पॅच मायक्रोसॉफ्ट ने दोन महिन्यापूर्वीच जारी केला होता .
४. तुमच्या संगणक किंवा लॅपटॉपचा नियमित डेटा कॉपी करून दुसऱ्या हार्ड डिस्कवर ठेवावा म्हणजे तुमचा संगणक हॅक झाला आणि तुमच्या डेटा च्या बदल्यात हॅकर ने तुम्हाला पैसे मागीतले तरी तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही .
 
स्मार्टफोन ला ही धोका
संगणकांप्रमाणे स्मार्टफोन ला ही हॅकिंग चा धोका वाढल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. अनेक वेळा तुमच्या स्मार्टफोन वर काही जाहिराती दाखवल्या जातात त्यातील काही जाहिराती ह्या हॅकरने तुम्हाला भुलवण्यासाठी सुद्धा टाकल्या असू शकतात .त्यामुळे अशा जाहिरातीला क्लिक करू नये तसेच एखादे एप तुमच्या स्मार्टफोन वर इन्स्टाल करण्यापूर्वी ते सुरक्षित आहे की नाही हे पाहून घ्या . शक्यतो गुगल प्ले वरून एप इन्स्टाल करा . कुठलीही ए पी के फ़ाइल घेऊन तुमच्या स्मार्टफोन वर इंस्टाल करू नका . 
 
एक वर्षांपूर्वी लोकमत ने दिला होता इशारा
सोमवार ६ जून २०१६ च्या अंकात लोकमतने ने 'रॅन्समवेअर' ह्या व्हायरस च्या संभाव्य धोक्याविषयी आपल्या वाचकांना इशारा दिला होता . तसेच 'रॅन्समवेअर' ह्या व्हायरसचा प्रतिकार करण्यासाठी काय काळजी घ्यावी याविषयी सविस्तर माहिती दिली होती . 'रॅन्समवेअर' च्या संभाव्य हल्ल्याचे भाकीत देखील लोकमतने केले होते . 
anil.bhapkar@lokmat.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा